अहमदाबाद - भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाला ४ सामन्याच्या कसोटी मालिकेत ३-१ ने सपाटून मार खावा लागला. आता उभय संघात १२ मार्चपासून टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधीच इंग्लंड संघासाठी एक वाईट बातमी आहे. इंग्लंडचा संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुखापतीमुळे हा गोलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर होऊ शकतो.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सद्या कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे तो भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आर्चरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ही दुखापत झाली होती. त्यानंतर सातत्याने त्याला या दुखापतीने ग्रासले आहे.
आर्चरच्या दुखापतीवर इंग्लंडचे वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे. त्यांनी आर्चरला ऑपरेशनची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र टी-२० मालिकेत तो खेळणार की नाही, याबाबत अंतिम निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकांनी, वैद्यकीय पथक काय सल्ला देणार, यावर त्याच्या समावेशाबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, जोफ्रा आर्चर टी-२० मालिकेतून बाहेर पडला तर हा इंग्लंड संघासाठी मोठा धक्का ठरेल.
हेही वाचा -सासरा शाहिद आफ्रिदीने ठोकला षटकार, त्यानंतर गोलंदाज जावईची कमाल, पाहा व्हिडिओ
हेही वाचा -विजय हजारे करंडक : RCBच्या फलंदाजाची फटकेबाजी; सलग चौथे शतक ठोकत संगकाराच्या विक्रमाशी केली बरोबरी