मुंबई- कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही सूचना केल्या आहेत. या सूचनांचा प्रचार क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, स्वत: पालन करून इतरानांही याचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागने आपल्या हटके स्टाईलने आवाहन केले आहे. त्याने भारताची गान कोकीळा लता मंगेशकर यांचं एक गाणं शेअर करत नागरिकांना जागृत राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सेहवागने १९५२ साली रिलीज झालेल्या 'साकी' चित्रपटातील एक गीत शेअर केलं आहे. हे गाणं प्रेमनाथ आणि मधुबाला यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं आहे. या गाण्याला संगीत सी. रामचंद्र यांनी दिलं तर लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं आहे. हाथ ना लगाइए. कीजिए इशारा दूर दूर से... असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचा व्हिडिओ सेहवागने कोरोनाची जागृती करण्यासाठी पोस्ट केला आहे.