दुबई -महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाने आयपीएलची सुरुवात दमदार केली. मात्र, सीएसकेला राजस्थान आणि दिल्लीविरुद्धचे सामने गमवावे लागले. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने प्रतिकार केला असला, तरी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा संघ संथ वाटला. याच मुद्द्यावर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्न्ई सघाला टोला लगावला आहे.
''चेन्नईच्या फलंदाजांना ग्लुकोज द्या'', सेहवागचा टोला - csk batsmen need glucose news
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. या कामगिरीमुळे विरेंद्र सेहवागने सीएसकेला टोला लगावला आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाज अद्यापही मुक्त खेळू शकले नाहीत. ते जलद धावा करण्यास सक्षम नाहीत आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या खेळात गती देण्यासाठी ग्लूकोजची आवश्यकता आहे, असे सेहवागने म्हटले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईला ४४ धावांनी पराभूत केले.
दिल्लीच्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. पुन्हा एकदा फाफ डु प्लेसिसने (४३) एकट्याने लढा दिला. चेन्नई २० षटकांत सात गडी गमावून केवळ १३१ धावा करू शकला. ''संघात फलंदाजीची कमतरता आहे आणि अजून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे'', असे धोनीने सामन्यानंतर सांगितले. तीन सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा हा दुसरा पराभव आहे.