किंग्स्टन -विंडीजविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. त्याबरोबर कर्णधार म्हणून विराटने कसोटीत २८ वा विजय संपादन करत धोनीच्या विक्रमाला मागे टाकले. कसोटीत भारताचा यशस्वी कर्णधार ठरल्यानंतर विराटने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या संघाने मला यशस्वी कर्णधार बनवले असे विराटने म्हटले आहे.
हेही वाचा -ISSF वर्ल्ड कप : चीन नव्हे तर भारताने गाठले पहिले स्थान, मनु भाकर आणि सौरभचा सुवर्णवेध
विराट म्हणाला, 'या कामगिरीपाठी संघाचा हात आहे. आमचे गोलंदाज चांगले आहेत. शमीकडे चांगली गोलंदाजी आहे, इशांत जिगरबाजपणाने गोलंदाजी करतो, जडेजा सर्वाधिक काळापर्यंत स्पेल टाकू शकतो. नावापुढे कर्णधार असले तरी हा संघाचा प्रवास आहे.'
कोहलीने भारतीय संघासोबत विंडीजच्या संघाचेही कौतूक केले. तो म्हणाला, 'विंडीजच्या संघाला आता त्यांच्या कमकुवत बाजू समजू शकतील. गोलंदाजीच्या बाबतीत हा संघ मजबूत आहे. केमार रोच आणि जेसन होल्डर चांगली गोलंदाजी करत आहेत. जर त्यांनी धावा वाढवल्या तर ते एक चांगले प्रतिस्पर्धी ठरू शकतात.' भारताने दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघावर तब्बल २५७ धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली. या सामन्यात गोलंदाजांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली असून रविंद्र जडेजा व मोहम्मद शमीने प्रत्येकी ३ तर इशांत शर्माने व बुमराहने १ गडी बाद केला.
विराटने धोनीला मागे टाकले -
विराट कोहली आता भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून त्याने सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या धोनीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विंडीजविरुद्धचा विजय हा विराटचा कसोटीतील २८ वा विजय ठरला. भारताचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीने कर्णधार म्हणून २७ कसोटी विजय मिळवले आहेत.