मुंबई- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ सामन्याच्या कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ या मालिकेसाठी कसून तयारी करत आहेत. तसेच फावल्या वेळेत काही क्षण एन्जॉयदेखील करत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दोन दिवसांपूर्वी एक मजेशीर फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. यात विराटसह मोहम्मद शमी आणि पृथ्वी शॉ चित्रविचित्र हावभाव करताना दिसून येत आहेत. विराटच्या त्या फोटो दखल पोलिसांनीसुद्धा घेत या फोटोच्या माध्यमातून पोलिसांनी एक इशारा दिला आहे.
विराटने तो फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे मीम्सदेखील तयार झाले. या फोटोवर नागपूर पोलिसांनीदेखील तुम्ही स्कल ब्रेकर चॅलेंज खेळलात तर तुमची अशी अवस्था होईल, असा इशारा दिला आहे.
काय आहे स्कल ब्रेकर चॅलेंज -
जगभरामध्ये सद्या स्कल ब्रेकर चॅलेंज लोकप्रिय ठरत असून हे चॅलेंज मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. यात ३ जण आडव्या रेषेत समान उभे राहतात. मध्यभागी उभा राहणारा उंच उडी मारतो. तेव्हा त्याचे पाय खाली जमिनीवर पोहोचण्याआधीच बाजूचे दोघे त्याला पाय मारुन पाठीवर जोरात खाली पाडतात.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.