मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू कोरोनाच्या वाढलेल्या धोक्यामुळे घरात आहेत. घरी असूनही खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी वार्तालाप करत आहेत. अनेक खेळाडूंनी यांच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृतीही केली आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने, भलेही आमचे हास्य खोटे वाटत असेल. पण आम्ही खोटे नाही, असे म्हटले आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे खेळाडू आपापल्या घरी कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. विराट, पत्नी अनुष्कासोबत वेळ व्यतित करत आहे. त्याने गुरुवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनुष्कासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने, भलेही आमचे हास्य खोटं असेल पण आम्ही खोटे नाही, असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
शेअर केलेल्या फोटोत विराट-अनुष्का हसताना दिसत आहेत. दरम्यान या फोटोसोबत विराटने आपल्या चाहत्यांना घराबाहेर पडू नका, असे आवाहनदेखील केले आहे. त्याने यासाठी घरातच राहा, तंदुरूस्त राहा आणि सुरक्षित राहा, असे हॅशटॅग वापरले आहेत.