दुबई - चेन्नईचा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे नाबाद अर्धशतक आणि अंबाटी रायुडूच्या ३९ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ८ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या चिवट अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूला २० षटकात ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारता आली. पण सलामीवीर ऋतुराजने मैदानात अखेरपर्यंत तळ ठोकत ख्रिस मॉरिसला षटकार खेचत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पराभव झाला असला तरी विराटने एक मोठी कामगिरी नोंदवत मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माला मागे टाकले आहे.
विराटचे हे ३९वे आयपीएल अर्धशतक ठरले. त्याने या सामन्यात ४३ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत केवळ १ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमात रोहित शर्माला मागे टाकत त्याने शिखर धवनच्या कामगिरीशी बरोबरी केली. ३९ अर्धशतकांचा टप्पा गाठणारा कोहली तिसरा फलंदाज ठरला. या यादीत ४६ अर्धशतकांसह हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर अव्वल आहे. तर, विराट आणि शिखर धवन संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.