नवी दिल्ली -टीम इंडियाचा कर्णधार विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विंडीजविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. विराटसेना आता विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत विराटला ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचा मोठा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
विराटला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. कर्णधार म्हणून विराटच्या खात्यात १८ कसोटी शतके आहेत. विंडीजविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन शतके झळकावली तर तो पाँटिंगला मागे टाकू शकतो. रिकी पाँटिंगच्या नावावर कर्णधार म्हणून १९ शतके आहेत.
भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. उद्या गुरुवारपासून या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार असून विराट हा नवीन विक्रम प्रस्थापित करतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विराटने एकदिवसीय संघापूर्वी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, विराटला कसोटीचे कर्णधारपद सोपवले गेले. आपल्या कर्णधारपदाच्या काळात, विराटने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये विजय मिळवला आहे. तर, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये त्यांना पराभव स्वीकाराला लागला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी, ऑस्ट्रेलियामध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. तब्बल ७१ वर्षांनी भारताला हा विजय साकारता आला होता.