दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे आव्हान एलिमिनेटर फेरीत संपुष्टात आल्यानंतर संघाचा कर्णधार विराट कोहलीवर टीका होत आहेत. गौतम गंभीरसह अनेक आजी-माजी खेळाडूंनी बंगळुरु संघाच्या कर्णधारपदावरुन विराटला हटवण्याची मागणी केली. परंतू संघाचे प्रशिक्षक सायमन कॅटीच यांनी विराटची पाठराखण केली आहे.
काय म्हणाले कॅटीच...
एका वेबिनारमध्ये बोलताना कॅटीच म्हणाले की, 'विराटसारखा खेळाडू कर्णधारपदावर असणे हे आमचे भाग्यचं आहे. तो अत्यंत चांगला खेळाडू असून सर्व खेळाडू त्याचा आदर करतात. तो संघातील इतर तरुण खेळाडूंसोबत खूप वेळ घालवतो. यात तो नेहमी त्यांच्यासोबत राहून त्यांना मार्गदर्शन करत असतो.'
विराटला श्रेय मिळायलाचं हवं...
विराटने देवदत पडीक्कलला पाठिंबा देत चांगला खेळ करण्यासाठी प्रेरित केले. असे कधीच कोणी करताना दिसत नाही. आयपीएल २०२० मध्ये आम्ही शेवटपर्यंत चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला यासाठी चांगली लढतदेखील दिली. याचे श्रेय कर्णधार म्हणून विराटला मिळायलाच हवे, असे देखील कॅटीच यांनी सांगितले.
अशी आहे आयपीएल २०२० मध्ये विराटची कामगिरी -
आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराटने १५ सामने खेळले. यात त्याने ४५० धावा केल्या. पण, महत्वाच्या सामन्यात त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. यामुळे बंगळुरुचे आव्हान संपुष्टात आले.
हेही वाचा -IPL २०२० : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड
हेही वाचा -IPL २०२० : विराटला झालयं तरी काय, पुन्हा केली स्लेजिंग; पांडेने दिले 'असे' उत्तर, पाहा व्हिडिओ