गुवाहाटी - भारत आणि श्रीलंका यांच्यात आज पहिला टी-२० सामना गुवाहाटीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दोनही संघ विजयाठी उत्सुक आहेत. पण या सामन्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीला एका चाहत्याकडून खास गिफ्ट मिळाले आहे. याचा एक व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
गुवाहटी शहरात राहणाऱ्या राहुल पारिख या तरुण चाहत्याने जुने मोबाईल आणि त्यांच्या तुटलेल्या भागांपासून विराट कोहलीचे एक सुंदर पोर्ट्रेट तयार केले आहे. त्याने गुवाहाटी सामन्याआधी ही भेट विराटला दिली. राहुलची ही कला पाहून विराटही अवाक झाला.
श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना गुवाहाटी येथे होणार असल्याचे समजल्यावर राहुलने हे पोर्ट्रेट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याने तीन दिवस व तीन रात्रीत हे चित्र तयार केले. विराटची भेट घेऊन त्याने हे गिफ्ट त्याला दिले. तेव्हा विराटने या पोर्ट्रेटवर ऑटोग्राफ दिले.