मुंबई -टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी यंदाचे वर्ष आनंददायी ठरले आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहली पुन्हा एकदा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने वर्षाच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ८५ धावांची खेळी करत हा विक्रम आपल्या नावावर केला.
हेही वाचा -#१५YearsofDhoni : पहिल्याच सामन्यात झाला होता शून्यावर बाद, नंतर ठरला 'सर्वोत्तम कर्णधार'
विराट कोहलीने ४४ सामन्यात ६४.६० च्या सरासरीने २४५५ धावा केल्या आहेत. यासह विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या विक्रमात रोहित शर्माला पछाडले आहे. रोहित दुसऱ्या स्थानी असून त्याने यंदा २४४२ धावा ठोकल्या आहेत. तर, पाकिस्तानचा बाबर आझम २०८० तिसर्या क्रमांकावर आहे.
यापूर्वी विराट कोहलीने २०१६ मध्ये २५९५ धावा, २०१७ मध्ये २८१८ आणि २०१८ मध्ये २७३५ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित कोहलीच्या पुढे होता, परंतु वर्षाच्या अखेरीस कोहलीने त्याला मागे टाकले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत मात्र, सलामीवीर रोहित शर्मा कोहलीच्या पुढे आहे. रोहितने यावर्षी २८ सामन्यांत १४९० धावा केल्या आहेत, तर कोहलीच्या नावावर १३७७ धावा आहेत.