कराची -मैदानावर असो किंवा मैदानाच्या बाहेर, पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद भारताविरुद्ध नेहमीच आक्रमक असतो. क्रिकेटमधील दोन्ही देशांमधील शत्रुत्व कायम ठेवण्यात मियांदाद कधीच चूकला नाही. पण जेव्हा भारतीय खेळाडूंचे कौतुक करण्याची वेळ येते तेव्हा त्याने कधी माघारही घेतली नाही. यावेळी त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे भरभरून कौतुक केले आहे.
हेही वाचा -"मोदीजी तुमचं नेतृत्वही फार विस्फोटक आहे"
'भारतीय क्रिकेट संघात सर्वोत्कृष्ट कोण आहे? असे कोणी मला विचारले तर मी विराट कोहलीची निवड करेन. विराटची बेपर्वा फलंदाजी मला आवडते. त्याच्याविषयी मला जास्त काही बोलण्याची गरज नाही. त्यांची कामगिरी स्वतःच सर्व काही सांगते. त्याचे आकडे पाहूनच तो सर्वश्रेष्ठ असल्याचे लोकांना वाटते. विराटने दक्षिण आफ्रिकेतही चमकदार खेळ केला होता. त्याने तेथे असमान विकेटवर शतकही केले होते', असे मियांदादने म्हटले आहे.
विराटची स्तुती करताना मियांदादने पाकिस्तानच्या संघावर ताशेरे ओढले. 'सध्या पाकिस्तान संघात असा कोणताही फलंदाज नाही जो ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारताच्या संघात स्थान मिळवू शकेल. आमच्याकडे गोलंदाज आहेत. पण, फलंदाजांची कमतरता आहे', असे मियांदादने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले आहे.