चेन्नई - इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २२७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील दोन्ही डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणे अपयशी ठरला. पहिल्या डावात १ धाव तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली. त्यानंतर अजिंक्यवर टीका करण्यात येत आहे. अशात सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला, पुढील सामन्यात अजिंक्यला वगळणार का? असा सवाल विचारण्यात आला. तेव्हा विराट या प्रश्नावर संतापला.
विराट म्हणाला की, 'अजिंक्य रहाणेविषयी असा प्रश्न विचारून तुम्हाला काही खळबळजनक उत्तर मिळेल, असे तुम्हाल वाटत असेल. पण तर तसे काहीच होणार नाही. अजिंक्य आमच्यासाठी पुजाराप्रमाणेच एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याला संघातून वगळण्यात येणार नाही. आम्हाला त्यांच्या प्रतिभेवर विश्वास असून त्याने अनेकदा आपली छाप पाडली आहे.'
अजिंक्यने मेलबर्न कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. याचा दाखल देत विराट म्हणाला, 'जेव्हा मेलबर्न कसोटीत संघाला गरज होती तेव्हा त्याने शतक झळकावले. त्याच्या त्या शतकामुळे सामन्याचा निकाल बदलला. केवळ या सामन्याच्या दोन डावांवरून तुम्ही अजिंक्यला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू शकत नाही.'