दुबई -भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजीच्या यादीत पहिल्या दोन स्थानांवर आपली पकड मजबूत केली आहे. तर गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहने पहिले स्थान कायम राखले आहे. सोमवारी आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली.
हेही वाचा -'त्यावेळी मी स्वत:वर गोळी झाडून घेणार होतो', भारतीय क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्यानंतर रोहित आणि विराटने हे स्थान बळकट केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत कोहलीने १८३ तर, रोहितने १७१ धावा केल्या. रोहितने बंगळुरु येथे झालेल्या तिसर्या वनडे सामन्यात ११९ धावा चोपल्या.
आयसीसीच्या या क्रमवारीनुसार, कोहलीचे ८८६ गुण असून रोहितचे ८६८ गुण आहेत. त्यांना अनुक्रमे दोन आणि तीन रेटिंग गुण मिळाले आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम ८२९ गुणांसह तिसर्या क्रमांकावर आहे. तर, दुखापतीतून सावरलेल्या बुमराहने ७६४ गुणांसह गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठले. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान यांचा समावेश आहे.
पहिल्या पाचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हे इतर गोलंदाज आहेत. भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा २७ व्या स्थानावर आहे. त्याने मालिकेत चार बळी घेतले.