नवी दिल्ली - भारतीय संघाने आफ्रिकेविरुध्दचा दुसरा कसोटी सामना जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाबाद २५४ धावांची खेळी केली. त्यांच्या या 'विराट' खेळीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात उतरत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान पुन्हा पटकावेल, अशी आशा आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही विराटचे कौतुक केले आहे.
शोएब अख्तरने आपल्या युट्युब चॅनलवर विराट हा जगातला सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचे मत व्यक्त केले आहे. शोएबने आपल्या चॅनलवर जवळपास १० मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात तो विराटच्या फलंदाजीसह नेतृत्वाचे कौतूक करताना दिसत आहे.
'मी जगभरातील कर्णधार पाहिले आहे. सगळे मठ्ठं आहेत. तर विराट हा फक्त एकमेव सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे.' असे अख्तर म्हणाला. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच त्याने सरफराज डोकं फिरलेला कर्णधार आहे, असे मत त्याने व्यक्त केले.