जयपूर - महाराष्ट्र संघाचे विजय हजारे करंडक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अखेरच्या सामन्यात महाराष्ट्राने यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर पुदुच्चेरीवर १३७ धावांनी विजय मिळवला. पण त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले.
महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत पुदुच्चेरीसमोर ४ बाद ३३३ धावांचा डोंगर उभारला. नाहर आणि बावणे यांनी दुसऱ्या गड्यासाठी १९२ धावांची भागीदारी केली. नाहरने १२० चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ११९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर बावणेने ११५ चेंडूंत १० चौकार आणि १ षटकारासह ११० धावा फटकावल्या. मधल्या फळीतील राहुल त्रिपाठीने नाबाद ५९ धावांची खेळी केली.