दिल्ली - विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईने कर्नाटकचा ७२ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत मुंबईची गाठ उत्तर प्रदेश सोबत आहे. उभय संघातील अंतिम सामना १४ मार्चला होईल.
उपांत्य सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर पृथ्वी शॉ याने तडाखेबंद शतक झळकावले. मुंबईच्या डावाची सुरूवात खराब झाली. तेव्हा शॉ याने आदित्य तरेसोबत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी नंतर शम्स मुलानीसोबत तिसऱ्या गड्यासाठी १५९ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला.
मुलानी ४५ धावांवर बाद झाल्यानंतर शिवम दुबे (२७), अमन हकीम खान (२५) ठराविक अंतराने बाद झाले. दुसरी बाजू लावून धरत पृथ्वी शॉने शतक झळकावले. त्याने १२२ चेंडूत १७ चौकार आणि ७ षटकारांसह १६५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने ४९.२ षटकात सर्वबाद ३२२ धावांचा डोंगर उभारला. कर्नाटककडून विजय कुमारने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णाने ३ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.