दिल्ली - मुंबई संघाने उत्तर प्रदेशचा अंतिम सामन्यात ६ गडी राखून धुव्वा उडवत विजय हजारे करंडक जिंकला. यूपीने सलामीवीर माधव कौशिकच्या नाबाद १५८ धावांच्या खेळीच्या जोरावर, मुंबईला विजयासाठी ३१३ धावांचे आव्हान दिले होते. मधल्या फळीतील आदित्य तरेचे नाबाद शतक (११८) आणि कर्णधार पृथ्वी शॉची आक्रमक अर्धशतकी (७३) खेळी याच्या जोरावर मुंबईने हा सामना ४१.१ षटकात ४ गड्याच्या मोबदल्यात जिंकला. मुंबईचे हे चौथे विजेतेपद ठरले.
अंतिम सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३१२ धावांचा डोंगर उभा केला. माधव कौशिक याने १५६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारासह १५८ धावा केल्या. यानंतर समर्थ सिंग (५५) आणि अक्षदीप नाथ (५५) यांच्या अर्धशतकाने उत्तर प्रदेशला मोठी धावसंख्या उभरता आली. मुंबईकडून तनुषने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर प्रशांत सोळंकीने एक गडी टिपला.
उत्तर प्रदेशने विजयासाठी दिलेल्या ३१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी ९.१ षटकात ८९ धावांची तुफांनी सलामी दिली. शिवम मावीने शॉला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. शॉने ३९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. यानंतर यशस्वी २९ धावांवर बाद झाला. तेव्हा यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरेने शम्स मुलानीसोबत तिसऱ्या गड्यासाठी ८८ धावांची भागिदारी करत विजयाचा पाया रचला.