मुंबई -विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज देवदत्त पडीक्कलची एक्सप्रेस सुसाट फॉर्मात आहे. त्याने केरळविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात खणखणीत १०१ धावांची शतकी खेळी केली. हे देवदत्तचे या स्पर्धेतील सलग चौथे शतक ठरले. या शतकासह देवदत्तने श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराच्या सलग ४ एकदिवसीय शतकांची बरोबरी केली आहे.
केरळने नाणेफेक जिंकून कर्नाटकाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा कर्नाटकच्या रवीकुमार समर्थ आणि देवदत्त या सलामी जोडीने केरळच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडत तब्बल २४९ धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान देवदत्तने आपले शतक पूर्ण केले. देवदत्तने ११८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारासह १०१ धावांची खेळी केली.