नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक २०१९ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड न झाल्याने, अंबाती रायुडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही दिग्गज खेळाडूंनी समजवल्यानंतर रायडूने आपला निर्णय मागे घेतला. निवृत्तीतून यु-टर्न घेतल्यानंतर रायुडूकडे एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नुकतेच रायुडुकडे हैदराबाद संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबाद संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, रायुडूला अक्षत रेड्डीच्या जागेवर संघाची धुरा देण्यात आली आहे. तर बी. संदीपला उपकर्णधार नियुक्त करण्यात आले आहे.
हेही वाचा -कपिल देव 'या' विद्यापिठाचे झाले 'कुलगुरू'
दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीला या महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेत निवड न झाल्यामुळे रायुडू नाराज झाला होता, पण व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मी त्याच्यात अजून क्रिकेट बाकी असल्याची जाणीव करुन दिली, अशी माहिती हैदराबादचे निवडकर्ते नियोल डेविड यांनी दिली.
हेही वाचा -चुरशीचा सामना जिंकत टीम इंडियाने पटकावला 'आशिया चषक', मुंबईचा अथर्व ठरला हिरो
विजय हजारे ट्रॉफीसाठी हैदराबादचा संघ -
अंबाती रायडू (कर्णधार), बी. संदीप (उपकर्णधार), पी. अक्षत रेड्डी, तन्मय अग्रवाल, ठाकूर टिळक वर्मा, रोहित रायडू, सीव्ही मिलिंद, मेहदी हसन, साकेत साई राम, मोहम्मद सिराज, मिक्कल जायसवाल, जे. मल्लिकार्जुन (यष्टीरक्षक), कार्तिकेय काक, टी. रवी तेजा आणि अजय देव गौड.