मुंबई - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जवळपास तीन महिन्यांपासून क्रिकेट खेळापासून लांब आहे. त्याने अखेरचा सामना इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर त्याने वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुध्दच्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. धोनी संघात नसला तरी त्याची चर्चा तर होतच असते. क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घालणारा धोनी आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.
क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजीची पिसे करणारा धोनी, क्रिकेट मैदान सोडून दुसऱ्याच मैदानात उतरला आहे. सध्या धोनी क्रिकेट सोडून फुटबॉल खेळताना दिसत आहे. नुकतेच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तो अभिनेता अर्जुन कपूरसोबत फुटबॉलचा सराव करताना दिसत आहे. ३८ वर्षीय धोनीचे फुटबॉल प्रेम जगजाहीर असून त्याने स्वतः इंडियन सुपर लीगमध्ये आपला एक संघ घेतला आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियामध्ये वेगळ्याच चर्चांना ऊत आला आहे.