सेंचुरियन - येथील सुपर स्पोर्ट पार्कवर सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेच्या व्हर्नान फिलँडरने अनोखा कारनामा करून दाखवला. निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या फिलँडरने आपल्या डावाच्या सुरूवातीची पहिली पाच षटके निर्धाव टाकत सर्वांनाच चकित केले.
हेही वाचा -गांगुलीच्या 'त्या' निर्णयावर केविन रॉबर्ट्स यांनी दिलं मत, म्हणाले...
इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद २८४ धावा केल्या. यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकच्या ९५ धावांच्या जोरावर आफ्रिकेला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला. त्यानंतर गोलंदाजीस मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाकडून फिलँडरने सुरूवातीची पहिली पाच षटके निर्धाव टाकत प्रेक्षकांना स्तब्ध केले. शिवाय, त्याने रोरी बर्न्स आणि जो रूटला माघारी धाडत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले आहे.
३४ वर्षीय फिलँडर जानेवारीत अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. नवीन वर्षातील इंग्लंड दौऱ्यांनतर फिलँडर निवृत्ती घेईल. २००७ मध्ये फिलँडरने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला फक्त सात टी-२० सामने खेळता आले. त्याने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले. फिलँडरने आतापर्यंत ५८ कसोटी सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. या ५८ कसोटी सामन्यांमध्ये फिलँडरच्या नावावर २१४ बळी आहेत. फिलँडरने ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ बळी मिळवले असून आफ्रिकेच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये फिलँडरचे नाव घेतले जाते.