मुंबई - भारत आणि इंग्लड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर उभय संघात १२ मार्च पासून ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी मागील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यात फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याचा देखील समावेश करण्यात आला आहे. परंतु आता एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, वरुण चक्रवर्ती हा टी-२० मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, वरुण चक्रवर्ती बीसीसीआयच्या निर्धारीत फिटनेस चाचणीत पात्र ठरलेला नाही. त्यामुळे त्याला भारतीय टी-२० संघातून बाहेर केले जाऊ शकते.
बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी नवीन फिटनेस चाचणी तयार केली आहे. यात खेळाडूला २ किलोमीटरची शर्यत ८.५ मिनिटात पूर्ण करावी लागले. यो-यो चाचणीत खेळाडूला कमीतकमी १७.१ गुण मिळवायचे असतात. मात्र या चाचणीत वरूण चक्रवर्तीला पात्र ठरता आले नाही.