नवी दिल्ली -बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी.. दिल्लीत आयपीएल रद्द!
तत्पूर्वी, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आयपीएलचे आयोजन दिल्लीमध्ये करण्यास मनाई केली आहे. याशिवाय शहरातील सर्व खेळांचे कार्यक्रम रद्द केले जाणार असल्याची घोषणा सिसोदिया यांनी केली. पुढील सूचना येईपर्यंत सर्व मोठे कार्यक्रम, परिषद आणि क्रीडा संमेलनांना दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे.
आयपीएलचा हंगाम असणार छोटा -
आयपीएलचा नवीन हंगाम १५ एप्रिलला सुरू होणार आहे. त्यामुळे लीगचा हा हंगाम आता छोटा केला जाऊ शकतो. यामध्ये राउंड-रॉबिन प्रकार रद्द होऊन सर्व आठ संघ दोन गटात विभागले जातील. नुकतीच संपलेली महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धा अशीच खेळवण्यात आली होती. आयपीएलच्या आधीच्या वेळापत्रकानुसार, रविवारी फक्त दोन सामने खेळले गेले होते. परंतु मीडिया रिपोर्टनुसार आता शनिवारीही दोन सामने खेळवता येतील.
कोरोनामुळे चीनमधील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच चीनी खेळाडूंना भारतासह अनेक देशांनी स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखले आहे. जुलै महिन्यात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही कोरोनामुळे संकटात सापडलेली आहे. तर आयपीएलवरही टांगती तलवार आहे.