सिडनी- भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि भारतीय संघ 'अ' गटातील अव्वल संघ म्हणून अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम फेरीत दाखल झाल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने भविष्यात अशा लढतींसाठी राखीव दिवस असायला हवा, असे मत व्यक्त केले आहे.
सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत हरमनप्रीत कौरने सांगितलं की, 'सामना न होता रद्द होणे हे दुर्दैवी आहे, पण त्यासाठी काही नियम आहेत आणि त्याचे पालन व्हायला पाहिजे. मात्र, भविष्यात उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस असायला हवे.'
उपांत्य फेरीत असा पेचप्रसंग निर्माण होईल, याची आम्हाला आधीपासून कल्पना होती. यामुळे आम्ही साखळी फेरीतील सर्व सामने जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. याचे सर्व श्रेय संघातील खेळाडूंना जाते. आता अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाल्याने संघातील सकारात्मता आणखी वाढली असल्याचे हरमनप्रीतने सांगितलं.