केपटाऊन - आयसीसी १९ वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धेत, भारताने ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. भारताने दिलेले २३४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ सर्वबाद १५९ धावा करू शकला. ४ गडी बाद करणाऱ्या कार्तिकला सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताची अवस्था ३ बाद ५४ अशी झाली होती. त्यावेळी एका बाजूने यशस्वी जयस्वाल याने दमदार फलंदाजी केली. त्याने ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी साकारली. यशस्वी बाद झाल्यावर अथर्व अंकोलेकरने अर्धशतक झळकावले. अथर्वने ५ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच भारताला २३३ धावा करता आल्या.
भारताचे २३४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया सुरुवात खराब झाली. सलामीवर जेक फ्रेझर-मॅकगर्क शून्यावर धावबाद झाला. त्यानंतर कार्तिक त्यागीने ऑस्ट्रेलियाला ३ धक्के दिले. त्याने कर्णधार मॅकेंजी हार्वी (४), लाचलान हियर्ने (०) आणि ओलिवर डेविस (२) यांना बाद केले. ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद १७ धावा अशी झाली होती. तेव्हा सलामीवीर सॅम फॅननिंग आणि पॅट्रिक रोवे यांनी भागिदारी रचण्याचा प्रयत्न केला.