राजकोट - चेंडू लागल्यामुळे खेळाडूने मैदान सोडल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात चेंडू लागल्याने चक्क पंचाला सामना सोडावा लागल्याचा प्रकार कदाचित पहिल्यांदाच घडला.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सध्या सौराष्ट्र विरुद्ध बंगाल या संघात रणजी करंडकाचा अंतिम सामना सुरू आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. पण पहिल्या दिवशी म्हणजे काल (ता. ९ मार्च) मैदानातील पंच सी. शमशुद्दीन यांना चेंडू लागला. त्यामुळे ते या सामन्यातून बाहेर पडले आहेत.
शमशुद्दीन यांना ओटीपोटाजवळ चेंडू लागल्यानंतर रात्री तीव्र वेदना झाल्या. यामुळे त्यांना आज सकाळी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. या कारणाने ते आज दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पंचगिरी करण्यासाठी आले नाहीत.
शमशुद्दीन यांच्या अनुपस्थितीत पहिल्या सत्रात मैदानावरील दुसरे पंच अनंता पद्मनाभन यांनीच दोन्ही बाजूची अंपायरिंग केली. कारण तिसरे पंच एस. रवी यांना टीव्ही पंच म्हणून काम असल्याने ते मैदानावर येऊ शकले नाहीत. दुसऱ्या सत्रात शमशुद्दीन रुग्णालयातून परतले. तेव्हा रवी हे पद्मनाभन यांच्यासह मैदानावरील पंच म्हणून मैदानात आले. तर शमशुद्दीन यांनी टीव्ही पंचाची भूमिका पार पाडली.
सामन्याच्या तिसऱ्या दिवसापासून म्हणजेच उद्यापासून यशवंत बर्दे हे शमशुद्दीन यांचे बदली पंच म्हणून मैदानात येतील. दरम्यान, शमशुद्दीन यांना लवकर बरे होण्यासाठी बीसीसीआयने ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -आयपीएलसह आरसीबीला कोरोनाचा फटका, काय आहे प्रकरण वाचा...
हेही वाचा -IPL २०२० : आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का