मेलबर्न - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव उर्वरित दोन्ही सामन्यांना मुकणार आहे. उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, दुखापत झाली होती. एएनआयने उमेश यादवने दौऱ्यातून माघार घेतल्याचे वृत्त दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायदेशात होणाऱ्या इंग्लंड मालिकेपूर्वी उमेश तंदुरुस्त होईल. मेलबर्न कसोटीनंतर त्याच्या दुखापतीचे स्कॅन करण्यात आले यात त्याचा रिपोर्ट पहिला असता, त्याला विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. तो तिसऱ्या व चौथ्या कसोटीला मुकणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यातील अॅडलेड येथील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला. यानंतर भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पुनरागमन केले आणि दुसरा सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
दुसऱ्या सामन्यादरम्यान, उमेश यादवला दुखापत झाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ८ वे षटक टाकत असताना उमेशच्या पायाला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. दरम्यान, पहिल्या डावात एकही बळी न घेतलेल्या उमेश यादवने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडले होते.
उमेश यादवच्या जागेवर कोणाला मिळणार संधी?