कराची- पाकिस्तान क्रिकेट संघात बदल करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून सरफराज अहमदला कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आणि नव्या तरुण खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले. दरम्यान संघात स्थान टिकवायचे असेल तर प्रत्येक खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागेल, या नियमाची कठोर अंमलबजावणी पाक बोर्ड करताना दिसून येत आहे. फिटनेस चाचणीत एक खेळाडू नापास ठरला. तेव्हा त्याने चक्क ट्रेनरसमोरच सगळे कपडे काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात येत होती. यात उमर अकमलनेही चाचणी दिली. या चाचणीत तो नापास ठरला. तेव्हा त्याने ट्रेनरसमोरच सगळे कपडे काढले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, ज्यावेळी त्याच्या शरीराच्या फॅटची चाचणी केली त्यात तो नापास झाला. त्यानंतर रागाच्या भरात अकमलने त्याचे सगळे कपडे उतरवले.