पॉटशेफस्ट्रूम- १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशच्या युवा संघाने बलाढ्य भारतीय संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. बांगलादेशने प्रथम विश्व करंडक जिंकण्याचा पराक्रम केला. विजयानंतर आनंद साजरा करताना बांगलादेशी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की केली. यावर भारतीय कर्णधार प्रियम गर्गने प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियम गर्गने सांगितले की, 'पराभवानंतर आम्ही शांतच होतो. जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. पण, त्यांच्या खेळाडूंनी आक्षेपार्ह हावभावाने रिअॅक्शन दिली. त्यांनी तसे करायला नको होते.'
काय घडले अंतिम सामन्यानंतर -
सामना जिंकल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू जल्लोष करण्यासाठी मैदानावर धावून आले. यातील काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना पाहून आक्षेपार्ह इशारे केले. यादरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यात बांगलादेशच्या झेंड्याचेही नुकसान झाले. वेळीच पंचांच्या मध्यस्थी करत वाद सोडवला.