वेलिंग्टन - भारतीय संघ २४ जानेवारीपासून न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघात ५ टी - २०, ३ एकदिवसीय आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याआधीच न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथमला दुखापत झाली आहे. यामुळे त्याने टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेदरम्यान, लॅथमला मार्नस लाबूशेनचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात बोटाला दुखापत झाली होती. तेव्हा त्याच्या बोटाचा एक्स-रे काढण्यात आला. उजव्या हाताच्या छोट्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यानंतर आता त्याला ठीक होण्यासाठी सुमारे चार आठवड्यांची आवश्यकता आहे.
गोलंदाज ट्रेट बोल्ट देखील भारतविरुद्ध मालिका खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मिशेल स्टार्कचा चेंडू लागल्याने बोल्टच्या हात फ्रॅक्चर झाला होता. या विषयी न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी सांगितले की, 'भारतविरुद्ध टी-२० मालिकेत बोल्टच्या खेळण्यावर संभ्रम आहे. बोल्टच्या उजव्या हाताला फ्रॅक्चरमुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे आणि या आठवड्यात गोलंदाजीला सुरुवात करेल.'