मुंबई- सचिन तेंडुलकर याला १०० वे शतक करण्यास रोखल्याने, मला आणि पंच रुड टकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असा दावा इंग्लंडचा गोलंदाज टिम ब्रेसनन याने केला आहे. ब्रेसनन याने 'यॉर्कशर क्रिकेट कवर्स ऑफ पॉडकास्ट'मध्ये बोलताना हा दावा केला.
ब्रेसनन याने सांगितले की, '२०११ मध्ये सचिनने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळताना आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या करिअरमधील ९९ वे शतक झळकावले. यानंतर तो इंग्लंड दौऱ्यावर आला. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात तो ९१ धावांवर खेळत होता. तेव्हा माझ्या गोलंदाजीवर पंच रुड टकर यांनी लेग साईडला जाणाऱ्या चेंडूवर सचिनला बाद ठरवले. यानंतर मला आणि पंच रुड यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाली.
ही धमकी एकदा नव्हे तर अनेकदा देण्यात आली. काही लोकांनी तर मला पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली. यात त्यांनी सचिनला तू बाद कसा केलास, असा जाब विचारला. तो चेंडू लेग साईडला जात होता. असे चाहत्यांचे म्हणणे होते.