मुंबई- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजचा (१२ एप्रिल) दिवस खास आहे. वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराने १६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी एक खास विक्रम रचला होता. तो विक्रम आज घडीपर्यंत अबाधित आहे. १२ एप्रिल २००४ साली लाराने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळताना ५८२ चेंडूत नाबाद ४०० धावांची अविश्वसनीय खेळी केली.
२००४ साली इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दौरा केला. यात ४ सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात आली. पाहिल्या ३ कसोटीमध्ये वेस्ट इंडिजचा संघ पराभूत झाला. ज्यात कर्णधार लारा याला फक्त १०० धावा करता आल्या. या मालिकेतील अखेरचा सामना अँटिगुआच्या सेंट जॉन्स मैदानावर होणार होता. विंडीजने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. पहिल्या दिवशी लाराने व्यक्तिगत ८६ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी तो ३१३ धावांवर पोहोचला. रामनरेश सरवन याच्यासोबत लाराने तिसऱ्या गड्यासाठी २३२ धावांची भागिदारी केली.