मुंबई -वनडे विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट मंडळाकडून (BCCI) आज १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व दिग्गज खेळाडू विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. आज जाहीर केलेल्या संघात युवा खेळाडूंना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे.
आज निवडण्यात आलेल्या भारतीय संघात तब्बल ८ खेळाडू हे पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत. धोनी चौथ्यांदा तर विराट कोहली तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर काही खेळाडूंची ही दुसरी विश्वकरंडक स्पर्धा असणार आहे.
हे ८ खेळाडू प्रथमच विश्वचषक स्पर्धेत होतील सहभागी
युझवेंद्र चहल, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, विजय शंकर, केदार जाधव आणि दिनेश कार्तिक.
आगामी विश्वचषक स्पर्धा ३० मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानेही आज सकाळीच विश्वकरंडकसाठी आपला संघ घोषित केला आहे. तर सर्वात प्रथम न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला होता. भारत हा विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा आतापर्यंतचा तिसरा संघ आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.