मुंबई -आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा ३० मेपासून इंग्लंड आणि वेल्स येथे सुरु होणार आहे. १९७५ ला चालू झालेली ही विश्वकरंडक स्पर्धा आतापर्यंत ११ वेळा खेळली गेली आहे. क्रिकेटविश्वात असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेलेत ज्यांनी प्रदीर्घ काळ क्रिकेटची सेवा केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या पहिल्या ५ दिग्गज खेळाडूंबद्दल.
विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारे ५ खेळाडू
- १. रिकी पाँटिग - ऑस्ट्रेलिया ( ४६ सामने)
आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाला सलग २ वेळा विश्वविजेता बनवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगने विश्वकरंडक स्पर्धेत एकुण ४६ सामने खेळले आहेत. आजवर विश्वकरंडकात एका खेळाडूने खेळलेले हे सर्वाधिक सामने आहेत. यात पाँटिगने ४५.८६ च्या सरासरीने १ हजार ७४३ धावा केल्या आहेत.
- २. सचिन तेंडुलकर - भारत (४५ सामने)
क्रीडा विश्वात क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने विश्वकरंडक स्पर्धेत एकुण ४५ सामने खेळले असून सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. सचिनने या ४५ सामन्यांमध्ये २ हजार २७८ धावा केल्या आहेत. याशिवाय विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक शतके (६) आणि सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. तसेच विश्वकरंडक कारकिर्दीत सचिनने सर्वाधिक ९ वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारही जिंकला आहे.
- ३. महेला जयवर्धने - श्रीलंका ( ४० सामने)
श्रीलंकेसाठी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा अनुभवी क्रिकेटपटू महेला जयवर्धने विश्वकरंडक स्पर्धेत एकुण ४० सामने खेळले आहेत. यात त्याने ३५.४८ च्या सरासरीने ४ शतकांच्या जोरावर १ हजार १०० धावा केल्या आहेत. जयवर्धनेने आपल्या कारकिर्दीत ५ वेळा विश्वकरंडक स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्याने आपला शेवटची विश्वकरंडक स्पर्धा २०१५ साली खेळली होती.
- ४. मुथय्या मुरलीधरन - श्रीलंका ( ४० सामने)
क्रिकेट जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणारा श्रीलंकेचा ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आपल्या पूर्ण विश्वकरंडक कारकिर्दीत ४० सामने खेळले आहेत. यात त्याने ६८ विकेट आपल्या नावे केले आहेत. विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत मुरलीधरन दुसऱ्या स्थानी आहे.
- ५. ग्लेन मॅकग्रा - ऑस्ट्रेलिया ( ३९ सामने)
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने आपल्या देशासाठी विश्वकरंडक स्पर्धेत ३९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३२५.५ षटके टाकताना ७१ विकेट मिळवले आहेत. विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ७१ विकेटसह मॅकग्रा अव्वल स्थानी विराजमान आहे. या स्पर्धेत सर्वाधिक वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकण्याच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी असून ६ वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मॅकग्राने आपल्या नावावर केला आहे.