नवी दिल्ली - रोहित शर्माच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील यशाचे श्रेय माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाच दिले जावे, असे मत माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. २००७मध्ये रोहितने जेव्हा पदार्पण केले तेव्हा तो मधल्या फळीत कमकुवत होता आणि त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य नव्हते. त्यानंतर धोनीने २०१३मध्ये रोहितला सलामीवीर म्हणून पाठवण्यास सुरवात केली, असे गंभीर म्हणाला.
गंभीर म्हणाला, “रोहित शर्मा आज जिथे आहे. त्याचे कारण धोनी आहे. तुम्ही निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटबद्दल बोलू शकता, पण जर तुम्हाला तुमच्या कर्णधाराचा पाठिंबा मिळाला नाही तर ते सर्व निरुपयोगी आहे. सर्व काही कर्णधाराच्या हाती आहे.”