नवी दिल्ली -अफगानिस्तानातील महत्वाची मानली जाणारी अफगानिस्तान प्रीमियर लीग स्पर्धा यंदा होणार नाही. अफगानिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचा दुसरा हंगाम रद्द केला आहे. लीगच्या व्यावसायिक भागीदारांकडून पहिल्या हंगामाचे पैसे मिळाले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -पाकिस्तानचा कर्णधार ठरला, सरफराजबाबत घेतला 'हा' निर्णय
एपीएलचा पहिला हंगाम यूएईमध्ये पार पडला होता. 'स्निक्सर स्पोर्ट्स पहिल्या हंगामासाठीस ठरवलेली रक्कम देऊ शकला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतचा करार संपवण्याचा निर्णय घेतला', असे बोर्डाने म्हटले आहे. याशिवाय, लीगमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, असेही बोर्डाने अटर्नी जनरल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मागील वर्षी ५ ते २१ ऑक्टोबरदरम्यान यूएईमध्ये एपीएलचा पहिला हंगाम झाला होता. या लीगमध्ये पाच संघ होते. ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, आंद्रे रसेल आणि राशिद खान यांसारखे मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळले होते. अशाप्रकारे रद्द झालेली ही दुसरी क्रिकेट स्पर्धा आहे. याआधी, युरो टी-२० स्लॅमचा पहिला हंगाम अनिश्चित कालावधीसाठी रद्द केला होता.
युरो टी-२० स्पर्धेत गुरमीत सिंह बॉम्बे स्पोर्ट्स आणि वुड्स एंटरटेन्मेंट या कंपनींचा समावेश होता. कॅनाडात पार पडलेल्या जीटी-२० स्पर्धेतही या कंपनींचा समावेश होता. पैसे न मिळाल्याने खेळाडूंनी या स्पर्धेला विरोध केला होता.