नवी दिल्ली - विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करत गुणातालिकेत अव्वलस्थान पटकावलं आहे. मात्र, आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड विरुध्द झालेला पराभव विराट अद्याप विसरू शकलेला नाही. त्याने माझ्या अहंकारामुळेच भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले असल्याचे सांगत, विश्वकरंडकाच्या कटू आठवणींना पुन्हा उजाळा दिला.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. त्या दावेदारीनुसार भारतीय संघाने खेळ सुध्दा केला. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखलं होतं. मात्र, फलंदाज अपयशी ठरल्याने, भारताचा १८ धावांनी पराभव झाला.
उपांत्य फेरीतील सामन्यांच्या पराभवाबद्दल बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला, ' स्पर्धेतील एका सामन्यात तरी माझ्याकडून सर्वोत्तम खेळीची अपेक्षा व्यक्त होत होती. उपांत्य सामन्यात मी नाबाद राहीन, असा मला विश्वास होता, पण एका अर्थाने तो माझा अहंकार सिद्ध झाला.'