चेन्नई - रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजीसोबत फलंदाजीदेखील उल्लेखनीय कामगिरी केली. त्याला या कामगिरीचा फायदा आयसीसीच्या क्रमवारीत झाल्याचे पाहायला मिळाले. अश्विनचे अष्टपैलू खेळाडूचे रॅकिंग सुधारले आहे. तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
अश्विनने चेन्नई येथील दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात १०६ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने संपूर्ण सामन्यात ८ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कसोटी अष्टपैलू खेळाडूच्या रॅकिंगमध्ये अश्विन ३३६ गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर असून त्याचे ४०७ गुण आहेत. होल्डरनंतर रविंद्र जडेजा ४०३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स ३९७ गुणासह तिसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन या यादीत चौथ्या स्थानी असून त्याचे ३५२ गुण आहेत.