चेन्नई -श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील पहिले दोन कसोटी सामने प्रेक्षकांशिवाय चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळले जातील. यजमान संघटना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या एका उच्च अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
हेही वाचा - ट्रेडिंग विंडो ओपन : बंगळुरूने दिल्लीच्या दोन अष्टपैलू खेळाडूंना घेतलं संघात
तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे (टीएनसीए) सचिव आरएस रामास्वामी यांच्या मते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूचनेनुसार दोन कसोटी सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जातील. रामास्वामी म्हणाले, "हो, विषाणूमुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता दोन कसोटी सामन्यांमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊ दिले जाणार नाही."
शिवाय, २० जानेवारीला टीएनसीएच्या सदस्यांना एक परिपत्रक पाठवण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, प्रेक्षकांशिवाय सामने खेळण्याचा निर्णय बीसीसीआयसोबत घेण्यात आला आहे. या परिपत्रकानुसार, "कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेसह कोणताही धोका न पत्रकरण्याचा निर्णय घेतला आहे."
चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर ५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान भारत आणि इंग्लंड या संघात पहिले दोन कसोटी सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जातील." दोन्ही संघांचे २७ जानेवारीपर्यंत चेन्नई येथे आगमन होईल. त्यानंतर खेळाडूंची कोरोना चाचणी होईल. यात निगेटिव्ह आलेल्या खेळाडूंना बायो-बबलमध्ये प्रवेश देण्यात येईल. पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून सुरू होईल.
केंद्र सरकारने अलीकडेच जाहीर केले आहे की, मानक ऑपरेटिंग प्रक्रियेनंतर ५० टक्के प्रेक्षकांसह मैदानी खेळांचे आयोजन केले जाऊ शकते.