नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी धोनी लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो, असे सांगितले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी सांगितले की, 'धोनी अनेक वर्ष क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्याने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आता तो एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम करू शकतो. त्यानंतर या वयात तो टी-२० खेळणे पसंत करेल. पण त्यासाठी त्याला पुन्हा मैदानावर उतरावे लागणार आहे.'
धोनीने विश्व करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण त्याने अद्यापही निवृत्तीबाबतची स्पष्टता दिलेली नाही. अशात ऑस्ट्रेलियातील त्याचा अनुभव संघासाठी उपयोगी ठरू शकतो. आयपीएलमध्ये त्याचा सहभागही टी-२० विश्व करंडक स्पर्धेची तयारी समजली जात आहे. आयपीएलमध्ये त्याने दमदार कामगिरी केली, तर त्याला टी-२० संघात नक्की जागा मिळेल, असेही शास्त्रींनी सांगितले.