विशाखापट्टणम -दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या आधारावर टीम इंडियाने पहिल्या कसोटीत आफ्रिकेचा २०३ धावांनी पराभव केला. ७० धावांत ८ गडी गमावल्यानंतर भारत सहज जिंकणार असे वाटत असताना मुथुसामी आणि पीड्त यांनी आफ्रिकेचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. मुथुसामीने ४९ तर पीड्तने ५६ धावांची झुंजार खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने पाच तर, रवींद्र जडेजाने चार बळी घेतले. पहिल्या डावात ७ बळी घेणाऱ्या अश्विनला मात्र, पाचव्या दिवशी एकच बळी मिळाला. दोन्ही डावांत शतक झळकावणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पाचव्या दिवशी १ बाद ११ वरून पुढे खेळताना सकाळच्या सत्रात पाहुण्या संघाने आपले चार महत्त्वाचे फलंदाज गमावले. उपकर्णधार टेम्बा बावूमा (०), क्विंटन डी कॉक (०) फाफ डू प्लेसिसला (१३) धावांवर मोहम्मद शमीने माघारी धाडत आफ्रिकेला हादरा दिला. तर, ब्रायनला (१९) अश्विनने बाद केले. मार्करम आणि एल्गर या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केल्यानंतर जडेजाने फिलॅंडर आणि केशव महाराज यांना खातेही उघडू दिले नाही. आफ्रिकेकडून डेन पीड्तने सर्वाधिक धावांची खेळी केली.
हेही वाचा -मोदी म्हणतात, एनबीएमुळे फिट इंडिया मुव्हमेंटला प्रोत्साहन मिळेल
विशाखापट्टणम येथील के राजशेखर रेड्डी मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात, चौथ्या दिवशी आफ्रिकेचा पहिला डाव ४३१ धावांवर आटोपला. तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात ५०२ धावा केल्या होत्या. यामुळे भारताला पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर भारतीय संघाने फलंदाजी करताना आपला दुसरा डाव ४ बाद ३२३ धावांवर घोषित केला.