मुंबई -यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा 2022पर्यंत स्थगित झाली असल्याचे आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले आहे. या निर्णयाची आयसीसीकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. क्रिकेट समितीच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आज टेलिकॉन्फरन्सद्वारे बैठक होत आहे.
माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने क्रिकेटमध्ये चेंडूवर लाळ वापरण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. चेंडूला चमक आणण्यासाठी गोलंदाज लाळ आणि घामाचा वापर करतात. मात्र, कोरोनामुळे आता खबरदारी घेण्यात येणार आहे. परिणामी क्रिकेटमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत.
काल झालेल्या नामनिर्देशन समितीच्या बैठकीमध्ये सर्व कसोटी क्रिकेट खेळणार्या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. अध्यक्ष शशांक मनोहर यांचा जुलैमध्ये कार्यकाळ संपणार असल्याने कालची बैठक महत्त्वाची होती. निवडणुकीची प्रक्रिया, संभाव्य उमेदवारांची निवड, निवडणुकांची वेळ या सर्व बाबी कालच्या बैठकीत निश्चित झाल्या आहेत. गांगुली स्वत: आयसीसी अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, यंंदाची विश्वकरंडक स्पर्धा स्थगित झाली तर आयपीएल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयसीसीच्या बैठका -
- मंगळवार - नामनिर्देशन समितीची बैठक - आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया.
- बुधवार - मुख्य कार्यकारी अधिकारी बैठक - क्रिकेट समितीच्या शिफारशींवर चर्चा होईल.
- गुरुवार - आयसीसी बोर्डाच्या सदस्यांची बैठक - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.