मुंबई - ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे भवितव्य अद्यापही अंधारातच आहे. १० जूनला आयसीसीच्या बैठकीत टी-२० विश्वकरंडक आयोजनाबद्दल चर्चा झाली, पण यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनाबद्दलचा निर्णय जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलला आहे. अशात यंदा विश्वकरंडकाचे आयोजन करणे, जवळपास अशक्य असल्याची कबुली क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी सांगितले की, 'यंदाच्या वर्षातऑस्ट्रेलियात टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करणे, सध्या तरी शक्य दिसत नाही. टी-२० विश्वकरंडक स्पर्धा अद्याप रद्द करण्यात आलेली नाही किंवा पुढे देखील ढकलण्यात आलेली नाही. पण सध्या या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या १६ संघांपैकी अनेक देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ते अद्याप यातून सावरू शकलेले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जगातील १६ देशांना एकत्र आणणे हे खूपच कठीण काम आहे.'
आयसीसी, सध्या चर्चा झाल्याप्रमाणे जुलै महिन्यात बैठक घेणार आहे. या बैठकीत बऱ्याचशा गोष्टीत बदल होण्याची शक्यता असल्याचेही एडिंग्ज यांनी सांगितले.