हैदराबाद - भारतीय टीमचा जलदगती गोलंदाज टी नटराजनसाठी ऑस्ट्रेलिया दौरा कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नटराजन भारताचा पहिल्याच असा खेळाडू आहे, ज्याला एकाच दौऱ्यात सर्व फॉर्मेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. नटराजनला नेट बॉलर म्हणून निवडण्यात आले होते. मात्र वरूण चक्रवर्ती जखमी झाल्याने त्याला टी20 टीममध्ये सामील करून घेण्यात आले.
त्यानंतर त्याला नवदीप सैनीबरोबर एकदिवसीय टीममध्ये जागा मिळाली व त्यानंतर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नटराजनला मर्यादित षटकांच्या मालिकेत विराट कोहली व कसोटीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली. टी नटराजनने दोन्ही कर्णधारांविषयी आपले मत मांडले आहे.
29 वर्षीय गोलंदाज नटराजनने सांगितले, की त्याला कोहली व रहाणे दोघांच्या नेतृत्वाखाली खेळताना चांगले वाटले. दोघांनीही त्याचे मनोबल वाढवले व प्रोत्साहन दिले. टी नटराजन म्हणाला की, विराट कोहली व अजिंक्य रहाणेने मला अनेक सकारात्मक गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्याकडून चांगला खेळ होण्यासाठी प्रेरित केले. मला दोघांच्याही नेतृत्वात खेळताना चांगले वाटले.