नवी दिल्ली -भारताचा डावखुरा स्फोटक फलंदाज सुरेश रैनाने सलीमीवीर रोहित शर्माला "पुढचा महेंद्रसिंह धोनी" म्हटले आहे. रैनाने रोहितच्या नेतृत्वातील गुणांवर प्रकाश टाकला आहे.
एका कार्यक्रमात रैनाने म्हटले, ''रोहित हा भारतीय क्रिकेट संघाचा पुढचा धोनी आहे. मी त्याला पाहिले आहे, तो शांत आहे. त्याला ऐकायला आवडते. खेळाडूंना आत्मविश्वास देणे हे त्याला आवडते. तो ड्रेसिंग रूमच्या वातावरणास आदर देतो.''
रैना पुढे म्हणाला, "त्याला वाटते की प्रत्येकजण कर्णधार आहे. मी त्याला पाहिले आहे. बांगलादेशमध्ये आशिया चषकात मी त्याच्या नेतृत्वात खेळलो आहे. शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल या युवा खेळाडूंना तो कसा आत्मविश्वास देतो, हे मी पाहिले आहे."
रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असून मुंबई इंडियन्ससाठी चार विजेतेपदे जिंकली आहे. 2018मध्ये निदाहास ट्रॉफी आणि आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद भारताने रोहितच्या नेतृत्वात मिळवले आहे. रोहितने 10 एकदिवसीय आणि 19 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्यातील अनुक्रमे 8 आणि 15 विजय मिळवले आहेत.