सिडनी- विश्वकरंडक २०१९ स्पर्धेचा अंतिम सामना हा क्रिकेट विश्वात अविस्मरणीय ठरलेला सामना म्हणून परिचित आहे. अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मूळ सामना अनिर्णित राहिला. तेव्हा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र, सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघाने समान धावा काढल्या. यामुळे अखेर सामन्यातील चौकार-षटकारांच्या निकषानुसार इंग्लंड संघाला विश्वविजेता ठरवण्यात आले. आयसीसीच्या या सुपर ओव्हरच्या नियमाबाबत प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर आता या नियमात बदल करण्यात आला आहे.
आयसीसीच्या नियमात हा बदल करण्यात आलेला नसून ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. लीग स्पर्धेत एक सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार असल्याचा नवा नियम बनवण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी या नव्या नियमाबाबत माहिती दिली.