मुंबई - ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. रोहित शर्माला दुखापत झाल्याचे सांगत या दौऱ्यातून वगळण्यात आले. बीसीसीआयने याची माहिती दिली. पण, दुसरीकडे रोहित शर्मा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे, हे फोटो, व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. यावरून भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर नाराज आहेत. त्यांनी याविषयी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
एका क्रीडा वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले की, 'रोहितला नेमकी काय दुखापत आहे, याबद्दल मला माहिती नाही. पण दुखापत गंभीर होती तर, त्याने सराव करण्याची गरज नव्हती. मला वाटते थोडी पारदर्शकता आणि माहिती मिळाल्यास सर्वांनाच मदत होईल. भारतीय क्रिकेट चाहत्यांना याविषयी जाणून घेण्याचा हक्क आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स जिंकण्यासाठी आली आहे. त्यांना माघार घ्यायची नाही, हे देखील मी समजू शकतो. आपल्या विरोधकांना, त्यांना कोणताही मानसिक फायदा द्यायचा नाही. पण आपण भारतीय संघाबद्दल बोलत आहोत. मयांक अग्रवालदेखील खेळलेला नाही. दोन महत्त्वाच्या खेळाडूंसोबत नेमके काय सुरू आहे, हे भारतीय क्रिकेट चाहत्यांना कळाले पाहिजे, असेही गावसकर सांगितलं.
काय आहे प्रकरण -
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काही तासातच रोहित शर्मा सराव करताना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा नेटमध्ये सराव करत असतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, बीसीसीआय रोहित दुखापतग्रस्त असल्याचे सांगत आहे. यामुळे रोहित दुखापतग्रस्त आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
आयपीएल २०२० स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया, तीन टी-२० सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती.
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ -
- विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज.
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.