मँचेस्टर - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने विंडींज विरूद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत पराक्रम रचला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात ब्रॉडने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत झटपट अर्धशतक ठोकले.
या कामगगिरीसह ब्रॉड इंग्लंडकडून कसोटीत तिसरा वेगवान अर्धशतक झळकावणारा तिसरा वेगवान फलंदाज ठरला. या सामन्यात ब्रॉडने 33 चेंडूत अर्धशतक ठोकले. ब्रॉडने 45 चेंडूत 9 चौकार व एका षटकारासह 62 धावा फटकावल्या. आपल्या धारदार गोलंदाजीने जगभर नाव कमावलेल्या ब्रॉडच्या या कामगिरीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्व अचंबित झाले आहे.
इंग्लंडकडून कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम इयान बोथम यांच्या नावावर आहे. दिल्लीत 1981-82 मध्ये त्यांनी भारताविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. दुसर्या क्रमांकावर बोथमच आहेत. ओव्हल येथे बोथम यांनी न्यूझीलंडविरुद्ध 32 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
इंग्लंडकडून वेगवान अर्धशतकाच्या बाबतीत माजी फलंदाज अॅलन लम्ब आणि माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्यासह ब्रॉड संयुक्तपणे तिसर्या क्रमांकावर आहे. 1991-92 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध लॅम्बने 33 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तर, फ्लिंटॉफने 2001-02 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 33 चेंडूत अर्धशतक केले होते.
कसोटीतील वेगवान अर्धशतकाचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सध्याचा प्रशिक्षक मिसबाह-उल-हकच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये अबूधाबी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 चेंडूत 50 अर्धशतक पूर्ण केले होते.