मुंबई- कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अनेकांना आहे त्या ठिकाणी अडकून रहावे लागले आहे. अशात आयसीसी पॅनलमध्ये असलेले पंच अनिल चौधरी त्यांच्या दोन मुलांसह एका छोट्याशा गावात अडकले आहेत. त्यांना तिथे मोबाईलचा नेटवर्कही व्यवस्थित मिळत नाही. नेटवर्क मिळवण्यासाठी त्यांना चक्क झाडावर जाऊन प्रयत्न करावे लागत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. अशात भारतीय पंच अनिल चौधरी उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्याच्या डांगरोल या गावात अडकले आहे.
अनिल चौधरी यांचे डांगरोल जन्मगाव आहे. ते त्यांच्या दोन मुलांसह एक आठवड्यासाठी गावी आले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे ते दोन मुलांसह गावी अडकले आहेत. पण त्यांची खरी अडचण ठरली आहे ती मोबाईल नेटवर्क. त्यांना दिल्लीमध्ये असलेल्या आई आणि पत्नी यांच्याशी संवाद साधायचा आहे. पण नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांना संवाद साधता येत नाही. तसेच त्यांना आयसीसीच्या ऑनलाईन कार्यशाळामध्ये सहभाग नोंदवता येत नसल्याने, त्यांची अडचण झाली आहे.